आज दीप अमावास्या!
उद्यापासून श्रावण महिना चालू..
लहानपणापासूनच श्रावण महिना माझ्या भारी आवडीचा आहे. मस्त पाऊस, हिरवा आसमंत, मंगळागौरीचे खेळ, सत्यनारायणाची पूजा, सणांच्या निमित्ताने तर्हेतर्हेची पक्वान्नं इत्यादींमुळे वातावरणात कसा मस्त उत्साह भरलेला असतो. श्रावण महिन्याच्या या उत्साहाचा आणि आनंदाचा संचार जसा माझ्यात झाला तसा तुमच्यातही होवो अश्या शुभेच्छा!
उद्यापासून श्रावण महिना चालू..
लहानपणापासूनच श्रावण महिना माझ्या भारी आवडीचा आहे. मस्त पाऊस, हिरवा आसमंत, मंगळागौरीचे खेळ, सत्यनारायणाची पूजा, सणांच्या निमित्ताने तर्हेतर्हेची पक्वान्नं इत्यादींमुळे वातावरणात कसा मस्त उत्साह भरलेला असतो. श्रावण महिन्याच्या या उत्साहाचा आणि आनंदाचा संचार जसा माझ्यात झाला तसा तुमच्यातही होवो अश्या शुभेच्छा!
मायबोलीवरील गणेशोत्सवात ही कथा सर्वप्रथम मी लिहिली होती. कथालेखनस्पर्धेचा विषयच असा होता की मोह आवरता येणं शक्यच नव्हतं. घरच्या गणपतीच्या गडबडीतही माझी खाद्ययात्रा जशी जमली तशी लिहून टाकलीच.
मग त्यानंतर तीन वर्षांनी तीच कथा 'माहेर' मासिकासाठी फेरफार करून नव्याने लिहिली.
******************************************
"मामाss...."
आज तिसर्यांदा दुकानावर येत
होते. गेल्या दोन खेपेला ब्लाऊज काही किडूकमिडूक कारणांमुळे मिळाले नव्हते. आज तरी
मिळतील ना? अश्या शंकेने मी अधीर होऊन आर्त स्वरांत मामांना हाक मारली.
मामांचं लक्षच नव्हतं. पुढ्यात
कापडांचा ढीग आणि सभोवताली बायकांचा... सवयीने त्यांचे हात झरझर चालत होते. समोरच्या
कष्टमरची मापं घेऊन टेप गळ्यात टाकायची, डायरीत मापं लिहायची, रीसीट बनवायची, कापडाचा
तुकडा रीसीटीला जोडायचा, कष्टमरला द्यायची की 'नेक्श्ट!' अशी हाक मारत पुढची कष्टमर
मापायला मामा मोकळे... पाच मिनीटात तीन कष्टमरांना संपवलं मामांनी... त्यांच्या या
चपळाईने प्रेरीत होऊन चौथी कष्टमर त्यांच्या पुढे उभी रहायच्या आत मी मधे घुसले आणि खणखणीत आवाजात ओरडले,
"मामा, माझे ब्लाऊज!!"
चष्म्याच्या काचेच्या वरून
मला आपादमस्तक न्याहाळत मामांनी टेबलावरची प्लास्टीकची पिशवी माझ्या पुढ्यात सरकवली.
अरेच्या! म्हणजे मी दुकानात शिरले तेव्हा टेबलाखालच्या कपाटातून काढून टेबलावर ठेवलेली
पिशवी माझ्याचसाठी होती तर... मी कशीबशी हसत ती पिशवी ताब्यात घेतली आणि मामांच्या
'नेक्श्ट!' ला जागा करून देण्यासाठी बाजूला झाले. पिशवीतले ब्लाऊज तपासून घेऊन एक पिवळी
नोट मामांना बहाल करत दुकानातून बाहेर पडले. एका पिवळ्या नोटेचा खातमा झाल्याच्या दु:खावर
उपाय म्हणून पर्समधलं एक डेअरीमिल्क खाल्लं आणि बहिणीच्या घरी मोर्चा वळवला.
"यादी लिहिली का गं? साबुदाणा
चांगला दे म्हणावं...मेल्यान् गेल्यावेळी पाठवलेला साबुदाणा नुसता चिक्कट होता. आणि
वर्याचे तांदूळ पण पाठवायला सांग. शेंगदाणे जरा जास्तीचे लिहिलेत ना? आणि उपासाची
भाजणी दिली का दळायला?"
दृश्य मोठं गंमतीशीर होतं.
ताईच्या आजेसासुबाईंनी आपल्या सुनेला वेठीला धरलं होतं. ताई ज्युनिअर म्हणून सुरक्षित
होती.
"ही कसली तयारी?"
ताईच्या हातात तिचा ब्लाऊज कोंबत मी कुजुबुजत विचारलं.
"श्रावण महिना..."
"रोजचं दूध जास्तीचं टाकायला
सांगितलं आहेस ना गं? रोज विरजणं लावत जा.. दही, ताक भरपूर हवं. मेलं उपासाचं खाऊन
पित्त व्हायला नको. मार्केटात केळी, चिकू, सिताफळ, डाळींब, पपया काय ताजी फळं दिसतील
ती घेऊन येत जा. आणि चांगलासा खजूर आणून ठेव घरी... अधनंमधनं खजुराचं दूध घ्यायला बरं.
म्हणजे उपास बाधत नाही. कळलं का?"
ताईच्या सासुबाई ढीम्म् होत्या.
हे संवाद त्यांच्या सवयीचे झाले असावेत.
"आणि तू गं, स्टेशनातूनच
येतेस ना
रोज?" माझ्याकडे
मोर्चा वळवत आजेसासुबाई वदल्या.
"हो.. हो.."
"मग कधी मधी चांगली रताळी,
सुरण, कोनफळ असलं काही त्या वसईवाल्याकडे दिसलं की इकडे आणून देत जा. माहिताय का कोनफळ
कशाला म्हणतात ते?"
'कोनफळच काय मला बेलफळ, सिताफळ,
रामफळ.. झालंच तर रावणफळ पण माहिताय' असलं आचरट उत्तर मी द्यायच्या विचारात असताना
माझ्या हातावर खोबर्याची वडी ठेवत ताईने माझी बोळवण केली. पुढील धोक्याची घंटा तिच्या
टाळक्यात वाजली असावी.
यंदाच्या उन्हाळ्यात आमच्या
आज्जीने 'झेपत नाहीत, सहन होत नाहीत' असं म्हणत आपल्या सगळ्या भरजरी साड्या प्रदर्शनात
काढल्या होत्या. आमच्या
मावश्या तिकडे
पोचायच्या आत
मी आणि ताईने
चपळाईने तिच्या गुलबक्षी पैठणीवर आणि अंजिरी शालूवर झडप घातली होती. 'तुम्ही त्या नऊवारी
साड्या फाडून ड्रेस शिवाल' असं म्हणत मावश्यांनी आमच्यावर दादागिरी करायचा प्रयत्न केला पण आम्हीही
त्यांच्याच भाच्या होतो. आज्जीकडून नऊवारीची सहावारी करायची परवानगी घेत साड्या आमच्याकडे
ठेवण्यात यशस्वी झालो.
आमच्या आज्जीचा ऐंशीवा वाढदिवस
अनंतचतुर्दशीच्या दिवशी दणक्यात करायचा घाट मामाने घातला होता. मग त्या साड्या नेसण्याचा
याहून सुंदर असा दुसरा मुहूर्त कोणता?
घरी पोचले. घाईघाईने पिशवी
उघडली. तो सुरेख अंजिरी रंगाचा अस्सल जरतारी काठांचा रेशमी ब्लाऊज पाहून मी अगदी हरखून
गेले. 'माझ्यासाठी म्हणून खास ह्यांनी हा शालू आणला बरं! एक आख्खा रुपाया खर्चून..'
असं प्रेमाने ओथंबलेल्या नजरेने सांगणारी आज्जी डोळ्यांसमोर उभी राहिली. सुमारे चौसष्ट
वर्षांपुर्वीचा आज्जीच्या लग्नातला शालू... तेव्हा होता तस्साच आजही... आणि तितकाच सुंदर. हा अनमोल
ठेवा आपल्याकडे आला म्हणून विशेष मोहरून गेले मी.
एका अनोख्या धुंदीत ब्लाऊज
चढवून बघितला अन् काय... खाडकन् वर्तमानात उतरले मी. घट्ट होत होता की हो तो! हाय रे
दैवा!!
पुन्हा तयारी करून लगेच घाईघाईने
शिंपीमामांकडे गेले. म्हटलं, श्रावणाची अन् गौरी-गणपतींची गडबड सुरू झाली की या असल्या
बारीक कामाकडे मामा ढुंकून पण बघायचे नाहीत.
"नाही होणार!"
"का नाही होणार पण? एक
लाईन फक्त उसवून द्या.." मी कासावीस होत मामांना म्हटलं.
"ताई, अस्सल रेशीम आहे
ते... का त्रास देता बिचार्याला?"
"अहो त्रास काय? मी घालू
कसा हा घट्ट ब्लाऊज?"
"घट्ट म्हणजे काय? श्वास
कोंडतोय का? गुदमरायला होतंय का?"
"नाही... म्हणजे तितकं
काही होत नाहीये.. पण थोडा और सैल चलेगा.."
"ताई, आता हा ब्लाऊज उसवून
घातलात तर शिवणीवर भोकं पडलेली दिसतील. चालेल का? तर देतो उसवून.."
"भोकं? आई गं! आता मी
कसा घालू हा ब्लाऊज?" अक्षरशः रडकुंडीला आले मी.
"बारीक व्हा!" पेर्ते
व्हा या चालीवर मामा म्हणाले.
मला एकदम अशोक सराफसारखं 'यूहॉहॉहॉहॉहॉ'
करून हसावंस वाटलं. बारीक व्हा काय... हा काय सल्ला आहे? 'जाड व्हा' म्हटलं असतं तर
शक्य होतं एकवेळ, पण बारीक व्हा?? काहीही..
मामांनी एव्हाना आपलं 'नेक्श्ट'
काम चालू केलं होतं त्यामुळे ब्लाऊज घेऊन दुकानाबाहेर पडण्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं.
घरी आल्यावर 'काय हे आपलं संचित?'
असं मनाशीच म्हणत सचिंत मनानेच जेवणं उरकली. ब्लाऊजात घुसायचं कसं? या प्रश्नाने मनाचा
पार भुगा केला होता. इतका, की नवर्याच्या 'मग? आता 'नेसली माहेरची साssडी' हे गाणं नाही म्हणणार का तू आज्जीच्या वाढदिवशी?' या प्रश्नाचा नुसताच अनुल्लेख
केला. त्या तुच्छ प्रश्नाचा अनुल्लेख तुच्छ कटाक्ष टाकूनच करावा हे भान उरलं नाही.
शेवटी 'अजून महिना आहे, तेव्हाचं तेव्हा बघू. नाही शिरले ब्लाऊजात तर नवा सोनेरी ब्लाऊज
घेतलाय तो घालू त्या शालूवर' असं मनाशी ठरवून झोपून गेले. झोपेतही, ताई माझ्या सोनेरी
ब्लाऊजला हसतेय, मावश्या काहीतरी कॉमेंट करून वैताग आणताहेत असलीच स्वप्नं पडत होती.
श्रावण सुरु झाल्यावर पहिल्याच
रविवारी आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठरली. आई-बाबा मेव्हणाचं जेवायला येतो म्हणाले.
मग बेतही खासा ठरला. आम्रखंड, पुरी, फ्लॉवरची रस्सा भाजी, मसालेभात, नारळाचं दूध घालून
टोमॅटोचं सार. बाकी इतर प्रसादाचा शिरा, खीर-पुरण, वरण भात होताच. सगळाच मेनू भन्नाट
आवडीचा. माझा प्रसादही अस्सा काही जमलाय म्हणता.. आम्रखंडही अगदी ताजं मिळालं... हम्म्!!
अंमळ जडच झालं जरा जेवण.
आहारल्याने डोळ्यावर सुरेखशी
ग्लानी आली होती. जरा पहुडणार तेवढ्यात आईने 'बघू गं जरा तुझा आज्जीच्या साडीवरचा ब्लाऊज'
असं म्हणत झोप खाडकन् उडवली. ब्लाऊज तिला दाखवताना अगदी तिखटमीठ लावून शिंपीमामांची
कंप्लेंट केली. पण आमच्या मातोश्रींनी बाऊन्सरच टाकला. म्हणते कशी, 'तुला घट्ट होतोय
म्हणजे मला एकदम बरोबर बसेल हा ब्लाऊज. मीच नेसू काय ही साडी?'
'नह्हीsss' म्हणत माझं किंचाळणं आणि नवर्याचं
खुनशी हसणं दोन्ही कसं जोडीनेच झालं.
मला कधीपासून खाऊन बघायची होती
ती 'दिंडं' स्नेहा नागपंचमीच्या दिवशी डब्यातून ऑफिसात घेऊन आली. आमच्याकडे नागपंचमीच्या
दिवशी कायम रव्याची खीर असायची. त्यामुळे 'दिंड' कधी खाऊन बघितलेलीच नव्हती.
मऊ लुसलुशीत शिजलेलं पुरण,
त्यावर कणकीचं आवरण
गरमगरम असतानाच तूप सोडून खाल्लं,
मग एकावरच कशी होईल बोळवण?
आता ऑफिसात कशी काय मिळणार
गरमगरम दिंडं? असा प्रश्न तुम्हाला पडायच्या आधीच सांगते, आमच्या ऑफिसात ओव्हन आहे.
काय वाट्टेल त्या गोष्टी तिथे गरम करता येतात. रोजचे डबे तर आम्ही गरम करून घेतोच पण
काही निवडक बायका त्यात लाडवाचं बेसन, कुटाचे शेंगदाणे इत्यादी घरगुती वस्तू देखिल
भाजून घेतात.
मंगळागौरीसाठी दोन मंगळवार
आधीच लागले होते आणि चक्क खेळायलाही बोलावणं होतं. नाहीतर हल्ली ह्या मुली जागरण नकोच
म्हणतात, म्हणे दुसर्या दिवशी ऑफिस असतं. येत नाहीत हो खेळ त्यांना आमच्यासारखे म्हणून
काहीतरी कारणं द्यायची झालं...
मंगळागौरीचं वातावरणही कसं अगदी ट्रान्समधे नेणारं असतं.
श्रावणातला पाऊस, मंगळागौरीची पत्री, केळीचे खांब, झेंडूचं तोरण, मोगरा, चाफा, गुलाब,
शेवंती इत्यादी निरनिराळी रंगीबेरंगी फुलं, ऊद, उदबत्त्या, निरांजनं, हळद-कुंकू, अत्तर,
गजरे, रेशमी साड्या या सगळ्याचे सुगंध कसे एकमेकांत सुरेखसे गुंफले गेलेले असतात आणि
त्यात भाजणीचे वडे, दही, मटकीची उसळ, गुलाबजाम, पुलाव किंवा मसालेभात या सुग्रास मेनूचा
दरवळ.. खेळ रंगतात, उखाणे रंगतात, गाणी रंगतात, गप्पा रंगतात आणि भर मध्यरात्री जायफळ
चढवलेली गोडसर कॉफी या सगळ्यावर कळस चढवते.
लागोपाठ दोन मंगळवार धूमशान
खेळल्यामुळे ब्लाऊजात आपण शिरू शकू या माझ्या अंधुकश्या कल्पनेला सुरूंग लागला. ब्लाऊजचं
फिटींग जैसे थे!
'शिंपीमामांच्या नावाने चांगभलं!'
म्हणत एक डेअरीमिल्क खाल्ली तेव्हा कुठे नैराश्य जरास्सं गेलं.
आमची राखीपौर्णिमा विशेष असते.
सगळ्या मामे-मावस भावंडांनी मिळून एका घरी जमायचं.
आधी ज्येष्ठ पिढीतले भाऊ कोचावर
बसणार, भगिन्या औक्षण करून त्यांना राख्या बांधणार.
मग श्रेष्ठ पिढीतले; म्हणजे
आमच्या पिढीतले भाऊ कोचावर बसणार, आम्ही सगळ्या बहिणी अतिशय कर्कश्य स्वरांत 'भैय्या
मेरे राखी के बंधन को निभाना' हे समूहगीत म्हणणार.
मग धाकटी पिढी. त्यांचा तर
भारी गोंधळ! ज्येष्ठ सगळे सगळ्या बाजूंनी सूचनांचा भडीमार करताहेत.. धाकट्या पिढीतल्या
बहिणींना राखी बांधायची नाहीये तर बांधून घ्यायचीये... कोण किंचाळतंय, कोण ओरडतंय...
मग एका क्षणी धीर सुटून श्रेष्ठ पिढीतली माता टीपेचा सूर लावते, मग पुढचा कार्यक्रम
मुसमुसत, हमसत पार पडातो.
धमालच सगळी!
जेवणाचा थाटही विशेष असतो.
ज्याचं घर तिने ओल्या नारळाच्या करंज्या करायच्या. बाकी पदार्थ बाकीच्यांनी ठरवून आणायचे.
यंदा, मेथी मटर मलाई, कोकोनट
राईस, अळूवड्या, खोबर्याची चटणी, सोलकढी, पोळ्या असा एकदम भारीभक्कम कोलेस्ट्रॉलयुक्त
मेनू होता.
आणि आपल्या आवडीच्या माणसांबरोबर
पोटात चार घास जरा जास्तीच जातात नाही का?
जेवण झाल्यावर मघई पानाची जोडी,
सोबतीला गप्पा आणि मग अगदी निघताना मामाने आणलेलं टेंडर कोकोनट आईस्क्रीम!
व्वा! क्या बात है!
गुरूवारी, 'उद्या डबा आणू नका'
अशी चित्राची ईमेल मी, स्नेहा आणि दिव्या अशी तिघींनाही आली. कारण काय ते कळलं नव्हतं.
'आयतं जेवण मिळतंय ना' या सुखासीन विचारात आम्ही कोणीही तिला कारण विचारायच्या भानगडीत
पडलो नाही.
शुक्रवारी नेहमीच्या ट्रेनला
चित्रा दिसली नाही. पण 'अकरा वाजेपर्यंत पोचतेय' असा तिचा एस्.एम्.एस्. स्नेहाला आला
होता.
दुपारी लंचटाईमला हातात चांगली
मोठी पिशवी घेऊन चित्राबाई अवतीर्ण झाल्या. पहिला डबा, दुसरा डबा, तिसरा, चौथा... अरे
काय! डबे संपायलाच तयार नाहीत. शिवाय एका प्लास्टीकच्या पिशवीत मण्यांच्या पट्ट्याही
होत्या. कँटीनवाल्याकडून अंमळ मोठ्याच प्लेटी चित्राने मागून घेतल्या. तीन चार डबे
तिने ओव्हनात गरम करायला ठेवले आणि आमच्या
टेबलावर तिने मांडामांड केली. एका डबीतून लिंबाच्या फोडी, एका डब्यात काकडीची कोशिंबीर
काढत आमच्या प्लेटीत वाढल्या. प्लेटीभोवती मण्यांच्या पट्ट्या मांडल्या. मग ओव्हनातले
डबे ती घेऊन आली. एकात साधा भात, एकात वरण, एकात बटाट्याची भाजी, एकात मसालेभात. आम्ही
आश्चर्याने बेशुद्ध पडायच्या मार्गावर असताना तिने अजून एका डब्यातून पुरणपोळ्या काढत
आमच्या प्लेटीत वाढल्या, त्यावर तूप वाढलं आणि म्हणाली, 'सवाष्णींनो, सावकाश जेवा!'
काय म्हणावं या उरकाला? इकडे
आमच्या हातून सकाळच्या घाईत पोळी-भाजी हे दोनच पदार्थ देखिल व्हायची मारामार आणि ही
बाई एवढे सगळे पदार्थ करून घेऊन आली?
'पुरणपोळ्या सासुबाईंनी कालच
करून ठेवल्या गं. मग सकाळी कोशिंबीर, भाजी, मसालेभात व्हायला कितीसा वेळ लागतोय? आणि
एका गॅसवर वरण्भाताचा कूकर चढवला, झालं काम. ऑफिसला दांडी नको आणि शुक्रवारची सवाष्ण
रविवारी घातली म्हणून अपराधी वाटायला नको.'
बाप रे!! दोन वाक्यात हीने
सगळा स्वयंपाक संपवला. आमचे दोन घास देखिल पुरते खाऊन झाले नव्हते.
पुरणपोळीच्या सुग्रास जेवणानंतर
डोळे मिटू मिटू होत होते. पण आम्ही ऑफिसात होतो. शिवाय सवाष्णीचं वाण म्हणून चित्राने
दिलेला ब्लाऊजपीस वाकुल्या दाखवत होता. घरी, कपाटात ठेवलेला अंजिरी रेशमी ब्लाऊज डोळ्यांसमोर
नाचत होता.
माहेर मासिकाचा 'अन्नपूर्णा
विशेषांक' चाळत असताना दोन विशेष पाककृती पसंतीला उतरल्या. मिनोती यांची संत्र-नारळाची
वडी आणि उषा पुरोहितांनी लिहिलेला 'कुंजबिहारी पेढा'.. म्हटलं, यंदा गणपतीला प्रसाद
म्हणून यापैकी एखादा गोड पदार्थ करायला हरकत नाही. पण डायरेक्ट प्रसाद करण्यापेक्षा
आधी एकदा ट्रायल घेऊन पहावी म्हणून आधी वड्या करून पाहिल्या... छानच झाल्या होत्या
अगदी खुसखुशीत, चव बघताना मीच ५-६ तोंडात टाकल्या. पेढाही करायला एकदम सोप्पा, चवही
अगदी सुरेख जमून आली. पुन्हा तीन-चार पेढे चव म्हणून स्वाहा! झाले. सर्वानुमते कुंजबिहारी
पेढाच गणपतीच प्रसाद म्हणून करायचा ठरला.
गणपतीत असणारी आमच्या कामवाल्या
काकुंची दांडी आता आमच्या सवयीची झाली आहे. त्यामुळे लवकर उठून केर-लादी, आदल्या दिवशीची
भांडी घासणं वगैरे पारोशी कामं उरकून, आंघोळ करून पुजेच्या आणि स्वयंपाकाच्या तयारीला
लागायचं हे ठरून गेलेलं आहे. शिवाय रीकामं होईल तसतसं एकेक भांडं घासून हातासरशी अडगवून
टाकायचं म्हणजे पसारा पडत नाही.
गणपतीच्या पहिल्या दिवशी दुपारी
जेवायला एकूण २० माणसं होती.. केर-लादी, नैवेद्याचा स्वयंपाक, मोदक, एवढ्या माणसांच्या
पंगती वाढणं, पंगत जेवल्यावर लादी पुसणं, आल्या-गेल्याची ऊठबस, सारख्या आत-बाहेर खेपा...
माझा अगदी पिट्ट्या पडला. दुपारी जेवायला ३ वाजले, भुकेची वेळ टळून गेली होती, फारसं
काही जेवण गेलंच नाही मला.. पहिलं वाढलेलंच जेमतेम संपवलं. मोदक गार झाल्याने तुपाचीही
धार नाही घेतली त्यामुळे मोदक खायची मजाच गेली.
आमच्या गणपतीचं विसर्जन झाल्यावर माहेरी गेले.. तिकडे गौरी-गणपती असतात. तिकडेही कामवाल्या बाईची सुट्टी.... सगळ्यांचा सण! आपणही समजून घ्यायला पाहिजे.
आमच्या मातोश्रींनी गौरीजेवणाचा
थाट अगदी झक्कास केला होता. मी आणि ताईने सुट्टीच घेतल्याने आईला कौतुकाच्या दोन्ही
माहेरवाशिणी मिळाल्या होत्या. मग मोठ्या लेकीला आवडते म्हणून बासुंदी आणि धाकट्या लेकीला,
म्हणजे अस्मादिकांना आवडतो म्हणून दुधीहलवा असा दुहेरी गोडाचा बेत होता. शिवाय कोथिंबीर
वडी, पुलाव, नारळाच्या दुधातली डाळींब्यांची उसळ, काकडीचं रायतं, अळूचं फदफदं वगैरे
अतिआवडीचे पदार्थ होतेच. सुग्रास जेवणाची, डोळे जडावून जी दुपारची झोप लागते ना, मला
फार आवडते ती... तशी एकदम झक्कास झोप लागली.
जेवणाव्यतिरिक्त, दर्शनाला
येणार्या मंडळींनी गणपतीसमोर प्रसादाला ठेवलेल्या पेढे-बर्फ्या येता-जाता तोंडात टाकण
चालू होतंच. मला अनंत चतुर्दशी डोळ्यासमोर नाचत होती तरीही मी खायचं काहीही बाकी ठेवत
नव्हते.
कारण जोडीला घरकामही होतंच. शिवाय,
तो सोनेरी ब्लाऊज रेडीमेड असल्याने 'स्ट्रेचेबल' होता.
गौरीविसर्जनाच्या दिवशी परत
मोदक आणि गौरींच्या पाठवणीच्या पाटवड्या... जिभेची अगदी तृप्ती झाली.
आज्जीच्या कार्यक्रमाला आता
जेमतेम चार-पाच दिवसच राहिले होते. तिच्या फोटोंचा एक मोठा कोलाज करायचा अशी कल्पना
डोक्यात होती. मग एक रात्र मामाकडे मुक्काम ठोकून त्याच्याकडचे सगळे जुने अल्बम चाळून
निवडक फोटो घेतले. एका जुन्या अल्बममधे मामीच्या मंगळागौरीचे फोटो सापडले. फोटो होते
कृष्णधवल, पण मंगळागौरीच्यावेळी आज्जीने तोच, अंजिरी रंगाचा शालू नेसला होता. कित्ती
मस्त दिसत होती आज्जी! हातात, गळ्यात भरगच्च दागिने, नाकात नथ, कानात बुगड्या, केसांचा
खोपा घातलेला, भरजरी शालू आणि अंगभर घेतलेला पदर.. तो फोटो पाहून मन अगदी भरून आलं.
पुढचे सगळे दिवस खपून आज्जीच्या
फोटोंचा मस्त कोलाज बनवला. कार्यक्रमाची बाकी सगळी तयारी केली. नवर्याचा कुडता-सलवार
इस्त्री करताना त्या अंजिरी रेशमी ब्लाऊजवरही जरा इस्त्री फिरवली. कोणास ठाऊक! कर्मधर्मसंयोगाने
तो ब्लाऊज होईलही आपल्याला.
आणि खरंच, अनंतचतुर्दशीच्या
दिवशी सकाळी सगळी तयारी झाल्यावर ब्लाऊज चढवला, आणि एकदम सुरेख फिट झाला. मला तर आनंदाने
उड्याच माराव्याश्या वाटू लागल्या.
'ड्रिम केम ट्रू' एवढाच एस.एम.एस.
ताईला पाठवला आणि भराभर पुढची तयारी उरकली. काय सुंदर दिसत होता तो शालू! मोजकेच पण
साजेसे दागिने घातले आणि आम्ही बाहेर पडलो. नवर्याच्या नजरेतली पसंतीची पावती सुखावत
होती.
आज्जीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम
दणक्यात पार पडला. आज्जीच्या तीनही मुली, जावई, मुलगा, सून, नातवंडं, पतवंडं, दोघी
बहिणी, त्यांचं कुटुंब सगळे सगळे आवर्जून हजर होते. तिच्या चेहर्यावर कृतकृत्यतेचं
समाधान विलसत होतं. आज्जी फक्त एवढंच बोलू शकली की 'माझं नशीब थोर म्हणून माझ्या भोवती
आज माझ्या भोवती एवढा गोतावळा जमलाय..' पण मी आणि ताई मात्र मनात म्हणत होतो की 'आमचं
नशीब थोर म्हणून आम्हाला तुझं प्रेम, तुझे संस्कार आणि तुझ्या आचारविचारांचा अमूल्य
असा ठेवा मिळालाय.'
- मंजू.
2 comments:
ब्लॉग-टेम्प्लेट खूप आवडलं. :)
:)
टिप्पणी पोस्ट करा