घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर या रोजच्या लोकलच्या प्रवासात अनुभवलेलं काही बाही
................................................................................
TGIF असं लोकं लिहितात तेव्हा आतून अगदी कसंसंच होतं. आम्हाला शुक्रवारनंतर अजून एक अख्खा दिवस ऑफिसात यायचं असतं, काम करायचं असतं. त्यामुळे कोणी TGIF म्हटलं की आमच्यासारख्या शनिवर्करांना किंचाळून OGIF (Oh God! Its still Friday!) असं म्हणावंसं वाटतं.
नाही म्हणायला शनिवारी जरा निवांतपणा असतो. ऑफिसात सगळे रंगीबेरंगी कपडे घालून येतात, आणि त्यामुळे बर्या मूडमधे असतात. एरवी तुडुंब भरून वाहणार्या लोकलमधेही शनिवारी तुलनेने गर्दी कमी असते, मोकळेपणाने बसता येतं, मैत्रिणींशी गप्पा मारता येतात. एरवी समोरासमोर बसलेलो असलो तरी शेवटचं स्टेशन आल्याशिवाय एकमेकींची तोंडही बघता येत नाही इतकी अतिप्रचंड गर्दी असते.
त्यादिवशी असाच एक निवांत शनिवार होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्यामुळे लोकलला गर्दी नव्हतीच. इकडे नको, तिकडे बसू असं करण्याइतका सीटचा चॉईस उपलब्ध होता. आम्ही अगदी आरामात गप्पा मारत बसलो होतो. दोन-चार फेरीवाले ट्रेनमधे चढलेले होते. बायका अगदी पारखून पारखून कानातले डूल, केसांच्या क्लिपा, छोट्यांसाठी रंगवायची पुस्तकं, कंगवे, नेलपॉलिशच्या बाटल्या वगैरे घेत होत्या.
ठाण्यानंतर मुलुंड गेलं, घाटकोपर आलं तरी चढणार्या बायकांना बसायला जागा मिळाली. पण एक मुलगी मात्र दारातच टेकून उभी राहिली. तिला पाहून डब्यातले फेरीवाले थोडे दचकले... एकमेकांना तिच्या नकळत खाणाखुणा करू लागले. हे सगळं तिला कळत होतं काय की... पण एव्हाना ट्रेन चालू झाली होती, त्यामुळे त्यांना उतरून जाणं शक्य नव्हतं. तिने शांतपणे आपल्या पर्समधून मोबाईल फोनचे प्लग काढले आणि कानात घालून गाणी ऐकत उभी राहिली.
"ही आहे ना... गुलाबी ड्रेस घातलेली, तिच्यावर लक्ष ठेव." माझी मैत्रिण अगदी कुजबुजत्या स्वरात तिच्याकडे निर्देश करत मला म्हणाली.
" का गं?"
"ती रेल्वे पोलिस आहे." त्या फेरीवाल्यांच्या खाणाखुणा करण्याचा उलगडा मला झाला.
"ओह्.. पण ती तर युनिफॉर्ममधे नाहीये." गुलाबी ड्रेसवालीच्या नजरेत बकरे पकडल्याचा आविर्भाव होता.
"ड्युटीवर चालली आहे ती. ते सगळे फेरीवाले जसे डब्यात पुढेपुढे सरकतील तशी ही पण त्यांच्या मागून पुढे सरकेल. आणि शेवटच्या कंपार्टमेंटमधे गेले की त्या दरवाज्याशी उभी राहिल, जेणेकरून त्यांना उतरता येणारच नाही."
"पण ती तर ड्युटीवर नाहीये ना... मग ती कशी काय पकडू शकते त्यांना?" माझे पांढरपेशे प्रश्न संपत नव्हते. आणि मैत्रिण तर अगदी सराईतासारखी मला माहिती पुरवत होती.
"ती त्यांना पकडणार नाहीच. ती काय करेल ते बघ, हेच मी तुला कधीपासून सांगतेय."
ती गुलाबी ड्रेसवाली मुलगी गाणी ऐकतेय असं दाखवत होती, पण तिचा एक डोळा त्या फेरीवाल्यांवर होता. त्यातले जे मुलगे होते, ते दादर स्टेशनला गाडी थांबल्यावर प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दरवाज्याने रेल्वे ट्रॅकवर उड्या टाकून उतरले, आणि सुटका झाल्यागत खिदळले. पण एक मुलगी मात्र आपल्या मालासकट इतक्या त्वरेने उडी टाकून उतरू शकली नाही. मग ती नाईलाजाने आपल्याकडचा माल विकत राहिली. तिचाही एक डोळा त्या गुलाबी ड्रेसवाल्या मुलीवर होताच. तिच्या नजरेत केविलवाणी भावना दिसत होती, गुलाबी ड्रेसवाल्या मुलीच्या नजरेत मात्र एक प्रकारची गुर्मी जाणवत होती.
भायखळा स्टेशन गेलं. मैत्रिण म्हणाल्याप्रमाणे गुलाबी ड्रेसवाल्या मुलीने त्या फेरीवाल्या मुलीला आता खिंडीत पकडलं होतं. तिच्या अंगावरून गेल्याशिवाय फेरीवाल्या मुलीला आता व्हिटीला उतरणं अशक्य होतं.
व्हिटी स्टेशन आलं. डब्यातल्या सगळ्या बायका उतरून गेल्या.
आम्ही मात्र चिवटपणे थांबून राहिलो. फेरीवाल्या मुलीचं काय होतंय ते आम्हाला बघायचं होतं. ट्रेन शेवटच्या थांब्यावर पोचली होती. आणि किमान दहा मिनिटं तरी तिथे थांबणार होती.
गुलाबी ड्रेसवाली मुलगी फेरीवाल्या मुलीकडे सरकू लागली. तिच्याकडचा माल बघतेय असं दर्शवत तिच्याशी हळू आवाजात काही बोलू लागली. इतर बायकांसारख्याच तिनेही बर्याच वस्तू पारखून पारखून घेतल्या. क्लिपा, कानतली, हातात घालायचं ब्रेसलेट जे आवडेल ते ती बाजूला ठेवत होती. फेरीवाली मुलगी हताश होऊन गुलाबी ड्रेसवाली काय काय घेतेय ते नुसती बघत उभी होती.
सात-आठ मिनिटांनंतर ती ट्रेन कुठे जाणार त्याची घोषणा झाली. त्यावेळी गुलाबी ड्रेसवाल्या मुलीजवळ वस्तुंचा बर्यापैकी ढीग जमला होता. आम्ही नुकत्याच ट्रेनमधे चढल्यासारख्या दारात उभ्या होतो. शेवटी काय होतंय त्याची जबरदस्त उत्सुकता होती.
ट्रेनची घोषणा झाल्यावर तुरळक बायका ट्रेनमधे चढल्या. गुलाबी ड्रेसवाली मुलगी बाजूला काढलेल्या वस्तू गोळा करू लागली. त्या सगळ्या वस्तू एका पिशवीत घालून देण्याविषयी तिने फेरीवाल्या मुलीला सांगितले. त्या मुलीने सर्व वस्तू तिला व्यवस्थित बांधून दिल्या, त्या तिने ताब्यात घेतल्या आणि पुन्हा आपला हात पुढे केला. फेरीवाली मुलगी अजिजीने तिच्याकडे बघू लागली. तरीही गुलाबी ड्रेसवाली मुलगी काही बधली नाही. ती हळूहळू आवाजात फेरीवाल्या मुलीला काहीतरी सांगत राहिली. फेरीवाल्या मुलीने अतिशय केविलवाणेपणे तिच्या हातातल्या वस्तू भरलेल्या पिशवीकडे बघून घेतलं. आणि अगदी निराश होऊन कनवटीच्या बटव्यातून एक पन्नास रुपयांची नोट काढली आणि गुलाबी ड्रेसवाल्या मुलीच्या हातावर ठेवली.
"हप्ता?" मी धसकलेच होते.
"हो! राजरोसपणे."
"आणि तिने पैसे दिले नसते तर?"
"तर ती तिला त्यांच्या मुख्याकडे घेऊन गेली असती, तिच्याकडचा माल जप्त केला असता आणि फेरीवाल्यांचा म्होरक्या येऊन तिला सोडवेपर्यंत त्यांनी तिला अडकवून ठेवलं असतं."
"पण सोडवून म्हणजे काय... म्होरक्यादेखील पैसे देऊनच सोडवणार ना?"
"हो, पण त्याने दिलेले पैसे त्यांना आपापसात वाटून घ्यावे लागले असते. आत्ता मिळालेले पैसे तिच्या एकटीचेच नाही का?"
"आणि शिवाय तिच्याकडच्या वस्तूही फुकट घेतल्या."
शेताला घातलेल्या कुंपणाचं ते रूप पाहून मी दिङ्मूढ झाले होते. शब्दशः हातावर पोट असलेल्या त्या फेरीवाल्यांना नाडून यांना काय मिळतं ते समजण्याच्या पलिकडे आहे. जर प्रवासी त्यांच्याकडच्या वस्तू विकत घेत असतात, तर रेल्वे या फेरीवाल्यांसाठी विशेष परवान्याची सोय का करत नाही? बरं, रेल्वेपोलिस पकडतात म्हणून फेरीवाल्यांची संख्या कमी होते आहे असेही नाही. त्यांना लोकलमधे अधिकृतपणे वस्तू विकण्याची परवानगी देण्यास काय हरकत आहे?
इतकी वर्ष रेल्वेप्रवास करूनही हा न उलगडलेला प्रश्न आहे.
- मंजू.

0 comments:
टिप्पणी पोस्ट करा