माझ्या ब्लॉगवर तुमचं मनापासून स्वागत!
खरंतर ब्लॉग रजिस्टर करून अडीच वर्ष झाली. इतक्या दिवसांत ब्लॉगवर एकही पोस्ट पाडली नाही की ब्लॉगकडे ढुंकून बघितलं नाही. ब्लॉग रजिस्टर करण्याची जशी सणक आली तशीच ब्लॉगवर पोस्ट लिहिण्याची सणक येऊन ही प्रारंभाची पोस्ट लिहिली. पण ती प्रकाशित केल्यावर आपण ब्लॉग जरा सजवायला हवा आहे ही जाणीव झाली. मग पोस्ट अप्रकाशित केली आणि सिंडरेलाकडे मदत मागितली. हो, तांत्रिक बाबतीत आपण अडाणी! फट् म्हणता फटॅक् व्हायचं, तेव्हा तज्ज्ञ लोकांची मदत घेतलेली बरी. विचारल्यासरशी तिने फटाफट चार पाच लिंका पाठवून दिल्या. शेकड्याने पसरलेल्या आंब्यांतून आपल्याला एकच आंबा निवडायचाय ही जाणीव होईपर्यंत पुन्हा मधे बरेच दिवस गेले. मग अतिचिकित्सा न करता हे टेम्प्लेट आवडले आणि दिले चिकटवून ब्लॉगला. तर, टेम्प्लेट कसे आहे, फॉन्ट वाचता येतोय का?, ब्लॉगमधे अजून काय बदल हवे आहेत हे मला नक्की कळवा.
ब्लॉग चालू करण्याचा माझा उद्देश आत्तापर्यंत लिहिलेलं सगळं एका ठिकाणी, नीटनेटकं, सहज सापडेल असं रहावं असा आहे. खरंतर कागदावर पेनाने वाईट अक्षरांत लिहिण्यापेक्षा कॉम्प्युटरवर लिहिणे सोपे, सोईस्कर आणि वेळ वाचवणारं. म्हणूनच कदाचित माझ्याकडून लिहिलं जात असावं. पण मी लेखिका नाही. शाळेत निबंधही कधी छान, चांगले, उत्कृष्ट वगैरे लिहिले नव्हते. मायबोलीवरील लेखन वाचता वाचता आपणही काही लिहून बघावं अशी ऊर्मी जागृत झाली. माझ्या लिखाणाच्या प्रयत्नाला अनपेक्षितपणे चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. काही चुकलं तर ते लोकांनी समजावून सांगितलं. सुधारणा सुचवल्या. तिकडे मी जे काही बरं-वाईट लिहिलं आहे ते एकेक करून ब्लॉगवर आणणारच आहे. त्याचबरोबर माझ्या हातून नवीन लिखाणही घडावं अशी इच्छा आहे. तुम्ही ते वाचाल आणि प्रतिक्रिया नोंदवाल अशी माझी अपेक्षा आहे.
इथे येत रहा आणि मी लिहिलेलं असंच काही बाही वाचत रहा!
- मंजू.
4 comments:
अभिनंदन मंजू आणि खूपखूप शुभेच्छा.
ब्लॊग सुरू केल्याबद्दल अभिनंदन. छान दिसतोय.
टेम्प्लेट साधे सोपे सुटसुटीत केव्हाही बरे. डार्क रंगावर पांढरी अक्षरे वरकरणी आकर्षक दिसतात पण वाचायला त्रास होतो त्यामुळे फॊन्ट मोठा ठेवल्यास बरे.
तुला हवी ती बॆकग्राउंड पण तू निवडू शकतेस. माझ्या ब्लॊगवर मी केलीये तशी. फार अवघड नाही ते. जरा उसंत मिळताच सांगेन.
ब्लॊगलिखाणासाठी शुभेच्छा!
- नी
ब्लॉग सुरू केल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील लेखनकार्यास शुभेच्छा :)
छान दिसतोय ब्लॉग. टेम्प्लेट नावाला सूट होतेय. http://marathiblogs.net/, http://marathiblogworld.blogspot.com/, http://www.indiblogger.in/ ही काही ब्लॉग संकलन करणारी संकेतस्थळं आहेत. तिथे ब्लॉगची नोंदणी नक्की कर. म्हणजे तू लिहिलेले वाचकांपर्यंत पोचणे सोपे होइल.
पुन्हा एकदा शुभेच्छा :)
khup chan lihile le aahes manju.......!!!
टिप्पणी पोस्ट करा