"अहो, पिंप शोधताय की झोपा काढताय माळ्यावर?"
भिडेकाकू खालून करवादल्या, तसे माळ्यावर चढलेले दिगूअण्णा दचकले.
"शोधतोऽऽय, शोधतोऽऽय...पिंपच शोधतोय.."
"मेला इतका कसा वेळ लागतो? एवढं मोठं तांब्याचं पिंप, खाचा झाल्या की काय डोळ्यांच्या?"
"अगं ह्या गोणत्यात किती भांडी ती? शोधायला लागणारच ना वेळ."
"अहोऽऽ, गोणत्यात कुठलं मावायला ते पिंप? एक काम धड करतील तर शप्पथ," काकू पुन्हा एकदा करवादल्या.
"इतकी धडपड करून मी तुझं पिंप शोधतोय त्याचं तुला काहीच नाही..." जमेल तेवढ्या क्षीण आवाजात त्यांनी उत्तर दिले.
"होय तर, इतका वेळ काय करताय वरती? बसले असाल ट्रंकेतले फोटो धुंडाळत. शेजारच्या काळ्याढुस्स यमीचा लहानपणातला परकर-पोलक्यातला फोटो मिळेल, पण ते मोठं पिंप काय मिळणार नाही. कुलकर्ण्यांच्या अप्पीच्या लग्नाला कोल्हापूरला गेलो होतो, तेव्हा घेतलं होतं ते पिंप. चांगलं पंधरा लिटरचं पिंप, किती सुबक घाट होता त्याचा आणि ठोके पण अगदी सुरेख पाडलेले. फोटो ठेवा बाजूला आणि शोधा लवकर ते पिंप...."
"आता नाही तुझं पिंप शोधून काढलं, तर पुढचे तीन दिवस सकाळी नाश्ता नाही करणार बघ."
भिडेकाकूंचं, यमीला काळीढुस्स म्हणून पुढे पिंपाच्या घाटाचं वर्णन करणं दिगूअण्णांना चांगलंच झोंबलं.
कुलकर्ण्यांच्या अप्पीच्या लग्नाच्या वेळी ते पिंप कोल्हापूरहून मुंबईला आणताना आपली निघालेली वरात दिगूअण्णांना आठवली. दादर स्टेशनावर दोन माणसांच्या चार बॅगा, पाण्याचा भलामोठा थर्मास, जेवणाचा टिफिन, ते तांब्याचं कुप्रसिद्ध पिंप, एक बायको आणि स्वतः दिगूअण्णा उतरवून होईस्तोवर गाडी सुटली होती. दिगूअण्णा टिफिन आणि पिंपासकट गाडीतच राहिले होते. खरंतर ते पिंप आपल्याशिवाय गाडीतून पुढे जाऊन बेवारशी गहाळ व्हावं, अशीच त्यांची इच्छा होती. पण भिडेकाकूंची "पिंपासकटच घरी या" अशी दरडावणी, त्यांना एक पाय फलाटावर आणि एक पाय गाडीच्या डब्यात अशा अवस्थेत लोंबकळत असताना ऐकू आली आणि ते गपकन् गाडीत घुसले. व्ही.टी. स्टेशनापर्यंत जाऊन परत येईस्तोवर ऑफिसं सुटण्याची वेळ झाली होती. गर्दी कमी व्हायची वाट बघताना दिगूअण्णांनी किमान दहा तरी लोकल सोडल्या आणि शेवटी अकराव्या लोकलमध्ये कसंबसं घुसून, सुसाट गर्दीतून लोकांच्या शिव्या खात त्या तांब्याच्या पिंपाला सुखरूप घरी आणेपर्यंत दिगूअण्णांचा जीव पिंपाच्या तोटीच्या स्क्रूएवढा व्हायची वेळ आली होती. ते घरी पोहोचले, तेव्हा भिडेकाकू निवांत जेवण वगैरे आटपून पलंगावर घोरत पडल्या होत्या. आणि दुसर्या दिवशी उठल्या तेव्हापासून पुढचे कमीत कमी बत्तीस दिवसतरी आपल्या नवर्याची पिंपासकट झालेली फजिती गावभर सांगत होत्या.
"कुलकर्ण्यांनी लग्नाचं जेवण काय नीट दिलं नाही. खारकरांच्या लग्नात बघ काय फर्मास जेवण होतं, अहाहा! काय सुरेख केला होता बटाटेभात, अजून चव आठवतेय त्याची. तुला काय जमत नाही तसा बटाटेभात करायला."
कुलकर्ण्यांचा आणि खुद्द आपल्या बायकोचा जमेल तसा निषेध व्यक्त करायचा दिगूअण्णांनी एक तोकडा प्रयत्न केला.
"जळ्ळा तो बटाटेभात... खा खा खाल्लात आणि पुढचे तीन दिवस बसला होतात भिंतीवर रेघा ओढत. तिसर्या दिवशी तर खडू हातात धरायचीही ताकद तुमच्यात राहिली नव्हती."
भिडेकाकूंच्या एका जळजळीत कटाक्षासोबत ह्या कटू आठवणी दिगूअण्णांनी गिळल्या.
"बरं, आत्ता मी खाली उतरतो. मला काहीतरी खायला दे. दुपारी जेवण झालं, की निवांतपणे मी पिंप शोधेन. ह्या नाहीतर दुसर्या गोणत्यात असेल."
"ठीक आहे. पण सांगून ठेवते, संध्याकाळपर्यंत माझं पिंप नाही मिळालं, तर तुम्हालासुद्धा गोणत्यात बांधून माळ्यावर टाकून देईन. समजलं?"
भिडेकाकूंच्या धमकीने गर्भगळीत झालेले दिगूअण्णा माळ्याला लावलेल्या शिडीवरून तोल सांभाळत कसेबसे खाली उतरले. महामायेचा अवतार असणारी आपली बायको स्वतःचा शब्द खरा केल्याशिवाय राहणार नाही ह्याची त्यांना पुरेपूर खात्री होती.
खरं म्हणजे दिगूअण्णा स्वतः खूपच गोंधळात पडले होते. सात-आठ महिन्यांपूर्वी कट्ट्यावर आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण तांब्याची काहीतरी एक वस्तू जुन्या बाजारात विकली होती, हे त्यांना आठवत होतं. पण ती वस्तू म्हणजे ताम्हन होतं की ते कोल्हापूरवालं पिंप होतं, हे मात्र त्यांना अजिबात आठवत नव्हतं. एक तर त्या चंडिकेच्या नकळत हे असले उद्योग करायचे म्हणजे मोठीच पंचाईत. त्यातून ते लक्षातही ठेवायचं म्हणजे खडतर परीक्षाच. पण करावंच लागतं. करणार काय? ही बया हातात एक पैसादेखील जास्तीचा उरू देत नाही.
वाढदिवसाची पार्टी मात्र झक्कास झाली होती. उपमा, गुलाबजाम आणि कटलेट असा झक्क बेत जमला होता. शिवाय सगळ्या मित्रांना त्यांनी कुल्फीसुद्धा खाऊ घातली होती. आता कट्ट्यावरच्या आठ मित्रांना एवढी पार्टी द्यायची म्हणजे केवळ ताम्हनावर भागणं शक्य नाही हे त्यांना उमजत होतं. जर का ती विकलेली वस्तू म्हणजे कोल्हापूरवालं पिंपच असेल, तर ही जगदंबा आपली रवानगी माळ्यावर करणार हे निश्चित होतं. आणि माळ्यावर गेल्यावर आपल्याला कदाचित दोन-चार दिवस खायला मिळणार नाही, हेही त्यांच्या हळूहळू ध्यानात यायला लागलं होतं. तेव्हा संध्याकाळपर्यंतच्या अवधीत आपण चार दिवसांचं पोट भरून घ्यावं, असा विचार करून दिगूअण्णांनी कधीच न आवडणारी नाचणीची आंबील चक्क चवीने पोटात ढकलली.
"काय हो? त्या पेढेघाटी डब्यात परवाच्या दिवशी मी चार गुलाबजाम राखून ठेवले होते पियूसाठी."
"अं?...हं हं..."
"आता अडीचच शिल्लक दिसताहेत. कुठे गेला उरलेला दीड गुलाबजाम?"
"मला काही माहीत नाही," तोंडावर बेफिकिरी आणण्याचा प्रयत्न करत दिगूअण्णांनी पेपरात तोंड खुपसले.
"काल शेजारच्या विद्याने वाटीभरून वाटली डाळ दिली होती. एकतर ती डाळ तुम्ही एकट्याने संपवलीत. तीसुद्धा मी घरात नसताना, माझ्या नकळत. आणि वर त्याच हाताने डबा उघडून गुलाबजाम खाल्लेत. हो की नाही? खरं सांगा."
"बहिर्जी नाईक...."
"कोण बहिर्जी नाईक? मी गुलाबजाम कुठे गेले ते विचारतेय," भिडेकाकू हातातलं उलथनं परजत म्हणाल्या.
"अगं शब्दकोड्यातला शब्द गं. शिवाजीचा गुप्तहेर कोण ते विचारलंय," साळसूद चेहरा करत दिगूअण्णा उत्तरले.
"त्या पेढेघाटी डब्याला बाहेरून वाटल्या डाळीचे कण चिकटलेत. कालच विद्याने देशपांड्यांच्या ललिताला वाटल्या डाळीची कृती अगदी मुद्देसूद लिहून दिली. वरून असं म्हणालीसुद्धा, की मी आजच केली होती. मी तेच म्हटलं, हिच्या घरात शिजलेल्या कुळथाच्या पिठल्याचा नमुनासुद्धा आमच्या घरी येतो आणि वाटली डाळ कशी नाही आली? वाटीसुद्धा परस्पर देऊन टाकलीत की नाही तिची माझ्या नकळत? खरं सांगा...... सांगा म्हणते ना? उघडा आपलं तोंड."
भिडेकाकूंच्या हातातलं उलथनं कपाटावर आपटून त्याचा खाणकन् आवाज आला. आणि वाग्बाणांच्या वर्षावाने भांबावून जात दिगूअण्णा शेवटी बोलते झाले.
"अगं बाई किती कीस पाडशील त्या डाळीचा? आता समजा मी खाल्ली ती एखाद् दोन चमचे, तर काय फरक पडतो?"
"एखाद् दोन चमचे नव्हे, चांगली वाडगाभर. आणि वर दीड गुलाबजामसुद्धा! आता बसाल फेर्या मारत. पण सारखी सारखी कोरी कॉफी मी करून देणार नाही सांगून ठेवते."
एक दोन चमचे... वाटीभर... वाडगाभर... हिशोब लावता लावता दिगूअण्णा त्रासून गेले.
स्वतःतर घरात काही चवीढवीचं करत नाही. नव्हे, नव्हे, करायला येतच नाही. रोजचा वरणभातसुद्धा करता येत नाही. कधी पाणीच जास्त, कधी मीठच कमी, ना हळदीचा पत्ता ना गुळाचा. पोळ्या केल्या करपून गेल्या; भात केला कच्चा झाला; वरण केलं पातळ झालं; असलाच प्रकार. स्वयंपाकावर मुळी प्रेमच नाही हिचं. बाकीच्या बायका कश्या तर्हा करतात खाण्याच्या! नवर्यांचे नुसते लाड करतात. घारगे, थालिपीठं, अळूवड्या, तर्हेतर्हेचे लाडू, वड्या, आंबोळ्या, कडबोळी, चकल्या, वरणफळं, सुरळीच्या वड्या काय विचारू नका! आणि आमच्या नशिबी नुसती हेरगिरी, फेर्या-मोजणी आणि धमक्यांवर धमक्या. ह्या घरात चवीने खाण्याचंसुद्धा स्वातंत्र्य नाही. आता आहे माझी प्रकृती जरा नाजूक. नाही पचत जरा वेगळं काही खाल्लेलं. म्हणून काय सारख्या फेर्या मोजत बसायच्या हिने?
विचार करता करता दिगूअण्णांना इतकं नैराश्य आलं, की दुपारच्या जेवणाचा त्यागच करावा असा निश्चय त्यांच्या मनाने केला. नाही म्हणायला नाचणीची आंबील आणि लेंग्याच्या खिशात लपवून माळ्यावर असताना खाल्लेले शंकरपाळे आणि दोन पेढे अंमळ जरा जडच झाले होते. आता हिच्या म्हणण्याप्रमाणे आपण वाडगाभर वाटली डाळ खाल्लीच असेल आणि बोलाफुलाला गाठ पडता समजा आपलं पोट बिघडलं, तर औषधाच्या गोळ्या हाताशी असाव्यात असा विचार करत दिगूअण्णा सदरा अडकवून बाहेर निघाले.
"अहोऽऽ, निघालात कुठं?" भिडेकाकूंनी तेवढ्यात टोकलंच.
"येतो जरा पाय मोकळे करून."
"पिंपाचं लक्षात आहे ना?"
"होऽऽऽ"
"लाईटचं बिल भरलंत?"
"होऽऽऽ"
"आणि टेलिफोनचं?"
"होऽऽऽ"
"इस्त्रीचे कपडे आणलेत?"
"होऽऽऽ"
"पासबुकं भरून आणलीत?"
"होऽऽऽ"
"मग ठीक आहे. मी पैसे काढून आणेन बँकेतून. आता थोड्या वेळाने भाजी आणायला मी मार्केटात जाणार आहे. पण तुम्ही आत्ता जाता जाता दळण टाका दळायला आणि वाण्याकडे यादी टाका, समजलं?"
"होऽऽऽ"
"मी कॅय किर्तन कॅरतेय कॅ? होऽऽऽ होऽऽऽ लॅवलंय केव्हाचं तॅ...."
आपली बायको तोंड वेंगाडून बोलते, तेव्हा दुष्ट कैकेयीसारखी दिसते हे आपलं जुनंच मत दिगूअण्णांनी अगदी घासून पुसून लख्ख केलं.
"हा दळणाचा डबा. बारीक दळ आणि गव्हावर गहू टाक म्हणावं. गेल्यावेळी ज्वारीवर गहू टाकले होतेन् मेल्यानं आणि महिनाभर पोळ्यांच्या भाकर्या होत होत्या."
"पोळ्या असतात आपल्याकडे? मला वाटलं भाकर्याच की काय..." हातानं डब्याच्या वजनाचा अंदाज घेत दिगूअण्णा पुटपुटले.
"काऽऽऽय म्हणालात? पिंपाचं आहे ना लक्षात? हांऽऽऽ...... सहा किलो गहू आहेत म्हणावं..किती? सहा किलो. आणि हे पैसे, दळणवाल्यालाच द्या. एकदा त्याचे पैसे थकवून तुम्ही जिलब्या खाल्ल्या होत्या. त्यानंतरचं आहे ना लक्षात?"
दिगूअण्णाच काय, त्यांच्या सात पिढ्यासुद्धा विसरणार नाहीत अशी पाळी दिगूअण्णांवर आली होती. हॉस्पिटलामध्ये काही न खाता-पिता केवळ सलाईनवर काढलेले चार दिवस, आणि रसाहारावर पुढचे पंधरा दिवस! आणि रस कसला, तर भेंडी, दोडका, पडवळ, कोबी, घेवडा इत्यादी इत्यादी. आजदेखील डायरियातला नुसता 'डा' जरी ऐकला, तरी दिगूअण्णांच्या अंगावर रोमांच उभे राहतात.
"झालं ते झालं गं बाई. ह्या असल्याच गोष्टी तुझ्या बर्या लक्षात राहतात?"
"तुमची बायको आहे ना! ठेवाव्याच लागतात लक्षात. मी म्हणून टिकले हो तुमच्या घरात, दुसरी एखादी....."
"तुमची आज्ञा असेल, तर मी प्रस्थान ठेवावे का देवीजी?" भिडेकाकूंना अर्ध्यावरच तोडत दिगूअण्णांनी सोईस्करपणे सुटकेचा मार्ग शोधला. भिडेकाकूंचं एकदा ते 'मी म्हणून...' चं पारायण सुरू झालं, की तासाभराची निश्चिंती असायची.
"निघॅ ऍतॅ.... पुरे झाला तुमचा नाटकीपणा. आणि जाताना यमीच्या घरात डोकावू नका चहासाठी. ती गेलीये डोंबिवलीला. कळलं ना?"
भिडेकाकूंच्या नकळत कपाळावर हात मारून घेत दिगूअण्णा बाहेर पडले. आत्ता यमीकडे गेलो असतो, तर तिने बालपणापासूनच्या मैत्रीला जागत वाफाळता चहा हातात ठेवला असता. बरोबर काहीतरी गरम, खमंग खायला दिलं असतं. पण तिलाही आजच डोंबिवलीला जायचं सुचलं? छे! आपलंच नशीब खोटं. आपल्या मनातलं आपल्या बायकोला कळतं आणि आपल्याला मात्र तिच्या मनातलं कसं काय बुवा काहीच कळत नाही? हे कोडं त्यांना लग्नाला तेवीस वर्षं होऊनही उलगडलं नव्हतं.
खाली उतरताना दिगूअण्णांना काकूंचा काळा बोका जिन्याच्या कोपर्यात अंगाचं मुटकुळं करून पहुडलेला दिसला. हा काळा असला, तरी हिला आवडतो आणि यमीला मात्र नावं ठेवायची एकही संधी सोडत नाही ही. न मागता त्याला रोज मऊमऊ सायभात देते ही अंबिका आणि मला मात्र नाचणीची आंबील, दुध्याचं सूप, बिटाचा रस. एकच लाथ त्या बोक्याच्या पेकाटात घालावी, अशी तीव्र इच्छा दिगूअण्णांच्या मनात उत्पन्न झाली. अश्शी हाणावी, की हात पाय दुखावून पळून जाईल कुठेतरी आणि फिरकणार नाही चार दिवसतरी. मग लागेल हिचा जीव टांगणीला. काकूंना धडा शिकवण्याची ही नामी संधी आहे, असं दिगूअण्णांना वाटलं. पण त्यांच्या हातात दळणाचा डबा होता. त्यामुळे मनातली तीव्र इच्छा त्यांना नेहमीप्रमाणे मनातच दाबून टाकावी लागली. तरीसुद्धा इकडे तिकडे बघत हळूच ते त्या बोक्याच्या शेपटीवर पाय ठेवण्यासाठी पुढे सरसावले. पण दिगूअण्णांची चाहूल लागताच तो बोका फिस्कारत उठला आणि त्यांच्या पायांत कडमडला. स्वतःचा तोल आणि दळणाचा डबा सांभाळताना दिगूअण्णांची अगदी तारांबळ उडाली. नुसता पाय उचलला तर ही तर्हा, मग लाथ मारली असती तर काय काय झालं असते रे देवा? लाथ हाणताना तो डबा सांडला असता, तर जगदंबेने त्यांची पूजाच बांधली असती. शिवाय अगदी कर्णा घेऊन गावाला तीर्थप्रसादाचं निमंत्रण दिलं असतं. आपला नवरा असा मुलखाचा बावळट्ट आहे आणि मी म्हणून त्याला ताब्यात ठेवलाय, हे जगाला सांगायला अजून एक संधी! पण मी नाहीये बावळट. एक दिवसतरी हिला सटकवल्याशिवाय राहणार नाही. पण सटकवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तिच्या अंगावर मोठ्ठ्याने ओरडायचं? पण माझ्या आवाजावर दोन सूर तरी तिचा आवाज चढतो. मग काय करायचं? तिने सांगितलेल्या कामांकडे साफ दुर्लक्ष करायचं का? की बहिरेपण आल्याचं नाटक करायचं? पण ती तर आपलं बिंग फोडण्यात हुश्शार आहे.
चालता चालता दिगूअण्णा निरनिराळ्या उपायांची चाचपणी करून बघत होते. पण त्यांचं डोकंच मुळी चालत नव्हतं. कारण त्यांचं तोंड चालत नव्हतं ना! घरातून निघताना झालेल्या झक्काझक्कीमुळे त्यांना शेंगदाणे खिशात टाकायला मिळाले नव्हते आणि मघाशी त्या काळ्या बोक्याशी झालेल्या झटापटीत फुटाण्यांची पुडी कुठे खाली पडली, काही कळलंच नाही. काकूंना धडा शिकवण्याचे विचार मोठ्या कष्टाने बाजूला सारून ते निमूटपणे त्यांनी सांगितलेल्या कामांकडे वळले. त्यांना वृत्तपत्र वाचनालयात जायची वेळ साधायची घाई झाली होती.
कोपर्यावर असलेलं मोफत वृत्तपत्र वाचनालय दिगूअण्णांच्या खास आवडीचं होतं. वृत्तपत्रांच्या फुकट वाचनाशिवाय इतरही अनेक आकर्षक गोष्टी तिथे होत्या. लोकांच्या सोयीसाठी नगरपालिकेने तिथे कायमस्वरूपी खुर्च्या बसवलेल्या होत्या. शिवाय त्यावर चांगली शेडही उभारलेली होती. एक मोठा गणपतीचा फोटो तिथल्या भिंतीवर बसवलेला होता. वर्तमानपत्र वाचायला येणार्या लोकांमध्ये भाविकही भरपूर असायचे. त्या फोटोखाली मारलेल्या बारक्या लाकडी फळीवर कोणी उदबत्ती लावून जायचे, तर कोणी कोणी त्या गणपतीला नैवेद्यही दाखवून जायचे. खडीसाखर म्हणा, फुटाणे, चणे, शेंगदाणे म्हणा, कधी खारीक, बदाम, काजू, तर कधी एक-दोन पेढेही ठेवलेले असायचे. असते बुवा एकेकाची श्रद्धा! पण त्या प्रसादाचा लाभ मात्र दिगूअण्णांना व्हायचा.
वाचनालयाला लागूनच एक फरसाणाचं दुकान होतं. तिथे तळणीचा घाणा कायम चालू असायचा. भिडेकाकूंच्या नकळत उरवलेले पैसे खिशात असतील, तर दिगूअण्णा आपल्या रसनेला तृप्त करायचे. पण ते डायरिया प्रकरण झाल्यापासून जिलबीपासून मात्र ते कटाक्षाने दूर असायचे. एरवी वडे, भज्या, कचोर्या, शेव, बुंदी, फरसाण सगळं यथेच्छ असायचं.
शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्या वाचनालयाच्या समोरच एक बालवाडी होती. अकरा वाजता सकाळचा वर्ग सुटायचा आणि लगेच पावणेबारा वाजता दुपारचा वर्ग भरायचा. मग वाचनालयात बसलेल्या दिगूअण्णांचा जीव अगदी फुलासारखा होऊन जायचा. तोंडासमोर वृत्तपत्र धरलेलं असलं की काम फत्ते! एक डोळा वृत्तपत्रात आणि एक डोळा रस्त्यावर ठेवायचं कसब दिगूअण्णांनी अगदी थोड्या सरावाने साधलं होतं. आपल्या गोंडस मुलांना शाळेत सोडायला येणार्या छान-छान आया पाहताना जीवनातल्या सगळ्या जटिल समस्यांचा दिगूअण्णांना विसर पडायचा.
एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे नेमून दिलेली कामं उरकून दिगूअण्णा आपल्या आवडीच्या जागेवर स्थानापन्न झाले. एकच नव्हे, तर चक्क दोन्ही डोळे वृत्तपत्रात घालून. भिडेकाकू कधीही तिथे अवतीर्ण झाल्या असत्या. 'मी मार्केटात जाणार आहे,' असा वैधानिक इशारा त्यांना निघता निघता मिळालाच होता. कपाशीच्या बोंडावरून स्वर्ग गाठणारी बाई ती! संशय आला, तर हा हक्काचा विरंगुळाही बंद व्हायचा. दिगूअण्णा निमूटपणे पेपर वाचू लागले आणि खरोखरच दहाव्या मिनिटाला भिडेकाकूंची स्वारी हातातल्या पिशव्या झुलवत तिकडे आली.
"ओऽऽऽ.... कुठे भटकत बसू नका. मी भाज्या घेऊन येते, पिशव्या उचलायला थांबा इकडेच, कळलं का?"
"हो.... हो.. थांबतोच," अधिकृत परवाना मिळाल्याप्रमाणे दिगूअण्णांचा चेहरा फुलून आला.
बालवाडीचा सकाळचा वर्ग अजून सुटला नव्हता. पण फाटकापाशी आयांची गर्दी जमू लागली होती.
अरे वा! त्या उंच टाचांच्या चपला घालणार्या आईने आज चक्क पंजाबी ड्रेस घातलाय. पण त्यामुळे ती जरा जास्तच उंच दिसतेय.
आणि तिच्याबरोबर नेहमी असणारी तिची मैत्रीण आज फुलाफुलांची साडी नेसून आली आहे. हातात आज काळी पर्स नाहीये. छोटंसंच पैशाचं पाकीट मुठीत दिसतंय. साडीवर पर्स कदाचित शोभत नसेल.
ह्म्म्, छोटुकलीच्या आईचे दिवस बहुधा भरत आले असावेत. चाल अगदीच मंदावलीय हिची. फार दिवस जमायचं नाही हिला पोरीला आणायला यायला.
सवयीप्रमाणे दिगूअण्णांच्या मनात एकेक नोंदी होत होत्या.
अरे! हे काय? ही नाकात चमकी घातलेली पोरगी आणि तो गॉगलवाला मुलगा किती वेळ त्या कोपर्यावरच्या स्कूटरवर बसून बोलताहेत? फारच माना वेळावून बोलतेय ती बया त्या गॉगलवाल्या मुलाशी! नखरेलच दिसतंय हे प्रकरण...
बाजूला फरसाणवाल्याने सामोश्यांचा घाणा तळणीत टाकला होता. त्याचा खमंग वास सगळीकडे सुटला होता.
दिगूअण्णांचा हात चार वेळा तरी खिशात जाऊन बाहेर आला होता. नेहमीप्रमाणे दळणवाल्याच्या पोराला वजनात गंडवून त्यांनी दळणातले पैसे उरवले होते. तेवढ्या पैशांत एक सामोसा आणि थोडीशी डाळमूठ नक्कीच आली असती. पण आपला सुखाचा जीव धोक्यात घालायला दिगूअण्णा थोडी काचकूच करत होते. ती जगदंबा मार्केटातच होती. भाजी-खरेदीला तिला अजिबात वेळ लागत नाही. सगळेच भाजीवाले ती म्हणेल ती भाजी, ती म्हणेल त्या किंमतीला लगेच देऊन टाकतात, हे अनुभवाने दिगूअण्णांना माहीत झालं होतं. आपण सामोसा घ्यायचो आणि तेवढ्यात ती महामाया इथे येऊन टपकली की झालं... वाजले आपले बारा. आधीच ते पिंपाचं प्रकरण डोक्यावर घोंघावतं आहेच, त्यात अजून भर नको, असा शहाणपणाचा विचार करून दिगूअण्णांनी इतकावेळ कसंतरी स्वतःला आवरलं होतं. पण तो खमंग वास आणि त्याहीपेक्षा तोंडाला सुटलेलं पाणी अगदीच आवरेना, तेव्हा दिगूअण्णांनी धाडस करून सामोसा आणि डाळमूठ घेतलीच.
ती नखरेल पोरगी अजूनही त्या गॉगलवाल्या पोराशी बोलत होती, हातातली पर्स गरागरा फिरवत. पळवून घेऊन जाईल ना कोणीतरी. तो मुलगा आता फारच धीट झालेला दिसतोय! जरा जास्तच सलगी करू बघतोय तिच्याशी. फटकावलं पाहिजे अशा लोकांना. आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत ह्याचं काही भान ठेवावं की नाही?
ताज्या डाळमुठीची चव जिभेवर उतरताच दिगूअण्णांचा मेंदू जरा हुशारला होता. ते अधिक बारकाईने त्या चमकीवाल्या मुलीचं आणि तिच्याबरोबर असलेल्या गॉगलवाल्या मुलाचं निरीक्षण करू लागले.
अरेच्या! आता हा कोण अजून एक ह्या दोघांच्या बाजूला टेहळतोय? निरुद्योगी मेला.. त्या दोघांचं लक्षही नाहीये त्याच्याकडे. आपल्याच विश्वात गुंग झालेत दोघे!
"ओय् ओय् ओय्!" हात झटकत दिगूअण्णा उठून उभे राहिले. डाळमूठ संपलेली त्यांच्या लक्षात आलीच नव्हती. चुकून त्यांनी स्वतःच्याच बोटाचा कडकडून चावा घेतला होता. दुखर्या बोटावर फुंकर घालत ते परत आपल्या खुर्चीवर बसून निरीक्षणाला लागले. आता जोडीला सामोसा होता. गरमागरम, खमंग!
आता तो दुसरा रोडरोमियो खिशातून कंगवा काढून भांग पाडत चालू लागला होता. त्याने फूटपाथाच्या ह्या टोकापासून दुसर्या टोकापर्यंत एक फेरी मारली. आणि परत खिशात कंगवा ठेवून जरा जास्तच जोरात चालत ह्या दोघांच्या दिशेने येऊ लागला.
"स्सस्स्! हाय्!" सामोसा अजूनही गरम होता. दिगूअण्णांची जीभ पोळत होती. पण त्यानेच तो अधिक चविष्ट लागत होता.
आता रोमियो जवळपास धावायलाच लागला होता. 'त्या दोघांचं' बाजूच्या जगाकडे अजिबात लक्ष नव्हतं. ती नखरेल बया आपली पर्स गरागरा फिरवत अधिकच लाडे लाडे बोलत होती. आता हा रोमियो पर्स पळवणार काय तिची? असा विचार दिगूअण्णांच्या मनात आला, तोच त्यांच्या डोळ्यांच्या कोपर्यांत भाजीच्या पिशव्या सावरत येणार्या भिडेकाकू विजेसारख्या लख्खकन् चमकल्या. दिगूअण्णांनी घाबरून जात हातातला सामोसा सगळाच्या सगळा पटकन तोंडात कोंबला. स्स्!! स्स्!! हाय् हाय्.... तोंड चांगलंच भाजलं.
तेवढ्यात रस्त्यावर पळापळ झाली.
"चोऽऽर.... चोऽऽर... चोऽऽर..." असा मोठा गलका ऐकू आला.
हातातला सामोशाचा कागद गडबडीने बाजूला सारत दिगूअण्णा आवाजाच्या दिशेने पाहू लागले. तो रोडरोमियो रस्त्यातून एखाद्या हरणासारखा वाकडा तिकडा पळत होता. त्याच्या हातात दिगूअण्णांना त्या नखरेल पोरीची पर्स दिसली आणि सगळं चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. तो गॉगलवाला पोरगा त्या रोडरोमियोच्या पाठून धावत होता. दोन-चार बघेही आपली मर्दुमकी दाखवायला त्याच्याबरोबर पळू लागले. ती पोरगी बिचारी भेदरून स्कूटरजवळच उभी राहिली होती. तिचं सांत्वन करायला तिच्याजवळ जावं असं दिगूअण्णांना फार वाटलं, पण हातात भाजीच्या पिशव्या झुलवत समोरून 'मांजर' आडवी येत होती. मनातली इच्छा मनातच दाबून गोंधळलेल्या मनःस्थितीत ते तसेच बसून राहिले.
तेवढ्यात त्यांना आपल्या पायाजवळ पडलेला सामोशाचा कागद दिसला. तो जर त्या चंडिकेच्या दृष्टीस पडला, तर मोठं रामायण घडेल हे तेवढ्यातही दिगूअण्णांना जाणवलं आणि तो कागद पायाने दूर ढकलण्यासाठी त्यांनी बसल्या जागी पाय लांब केले .... आणि काय आश्चर्य! तो रोडरोमियो त्यांच्या पायाला अडखळून धपकन् रस्त्यावर पडला! दिगूअण्णा गडबडीने टुणकन् उभेच राहिले. त्या रोमियोच्या पाठोपाठच त्याचा पाठलाग करणारे सगळे मर्दमावळे तिकडे येऊन ठेपले. एकाने त्याची गचांडी धरली, तर दुसर्याने खाडखाड त्याच्या मुस्कटात लगावायला सुरुवात केली. गॉगलवाल्या पोराने मात्र झडप घालून सर्वांत आधी ती पर्स हस्तगत केली.
रोमियोला पकडल्यावर ती पोरगीसुद्धा धावत येऊन गॉगलवाल्याला चिकटली. ते दोघेही दिगूअण्णांकडे अतिशय कृतज्ञतेने पाहू लागले.
तेवढ्यातच भिडेकाकूही तिथे येऊन उभ्या ठाकल्या. उन्हातून आल्यामुळे की भाजीच्या पिशव्या उचलल्यामुळे कोण जाणे, पण त्यांचा चेहरा चांगलाच फुलला होता. त्यांच्या चेहर्यावरचे उग्र भाव वाचून दिगूअण्णा मनाशी चरकलेच.
"अगं तो आपला आपण पडला येऊन इथे. मी नाही काही केलं...खरंच.." उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून दिगूअण्णा बोलून गेले.
"ह्म्म्म् , ह्या पिशव्या पकडा आणि चला घरी.."
"अहो काकू, ह्या आजोबांमुळे हा चोर पकडला गेला. माझी पर्स मारून नेत होता. ह्या आजोबांनी त्याला पायात पाय घालून पाडलं म्हणून त्याला पकडता तरी आलं." नखरेल पोरगी दिगूअण्णांची बाजू घेत काकूंना समजावू लागली.
तिचं बोलणं ऐकता ऐकता दिगूअण्णांना नक्की काय झालं ह्याचा अंदाज आला.
"ह्या चोरांना काय, फुकट ते पौष्टिकच. चोर्यामार्या करून पोट भरण्यापेक्षा कष्टाचं अन्न खावं," आपली कॉलर ताठ करत दिगूअण्णा सुरू झाले.
"आपण कायमच सजग आणि सतर्क राहावं. कोण कधी अचानक संधी साधेल ह्याचा अजिबात भरवसा नाही. आणि पोरी, तूसुद्धा इतकी खुळी कशी गं? आपल्या वस्तूंची काळजी घेता येऊ नये?" मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत दिगूअण्णा त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.
"बरोबर आहे काका तुमचं.... " ठोकलेल्या भाषणाचा थोडातरी उपयोग झाला म्हणायचा, पोरगी आजोबांवरून काकावर आली होती. दिगूअण्णा मनोमन खूष झाले.
उघडपणे मात्र ते एवढंच म्हणाले, "आम्हां रिटायर्ड लोकांनासुद्धा सामाजिक भान ठेवावंच लागतं, फुकटचं बसून पेन्शन खात नाही आम्ही."
हे शेवटचं वाक्य म्हणजे भिडेकाकूंना टोमणा होता बहुधा.
काकूंनी एकच प्रेमळ कटाक्ष दिगूअण्णांकडे टाकला आणि तेवढ्याच प्रेमळ आवाजात त्या म्हणाल्या, "चलताय ना आता? त्या पकडलेल्या चोराचं काय करायचं, ते बघून घेतील ही मंडळी. आपण निघावं नाही का?"
दिगूअण्णा आधी दचकलेच. लग्नानंतरच्या तेवीस वर्षांत बायकोचा हा सूर त्यांनी ऐकला नव्हता. उपस्थित प्रेक्षकांच्या चेहर्यावरसुद्धा दिगूअण्णांबद्दल कौतुकाचे आणि कृतज्ञतेचे भाव निथळत होते. हाच आपला गौरवाचा क्षण असे वाटून दिगूअण्णांनी काकूंच्या हातांतल्या सगळ्याच पिशव्या आपल्या हातांत घेतल्या आणि विजयोन्मादाने म्हणाले, "चलाऽऽ."
एखादं युद्ध जिंकल्याच्या थाटात दिगूअण्णा काकूंच्या मागून चालू लागले. आपली बायको आपल्या सत्काराप्रीत्यर्थ खीर-पुरीचं जेवण करील, अशी स्वप्नं त्यांना पडू लागली. खीर-पुरी नाहीतरी किमानपक्षी गोडाचा शिरा तरी? एका चोराला पकडून दिलंय आपण! केवढा मोठा पराक्रम गाजवलाय! मोठ्ठं धाडसच केलंय. आता तरी बायको आपल्यावर करवादणार नाही. आपल्याला कामं सांगणार नाही. चांगलंचुंगलं करून खायला घालेल. नुसतं बसून रहायचं. काहीही काम नाही, फक्त बसून खायचं!
स्वप्नरंजनात मश्गूल झालेल्या दिगूअण्णांना पायाखालचा रस्ता संपून घर कधी जवळ आलं, ते कळलंच नाही.
घराच्या दारातच काळा बोका मुटकुळं करून बसला होता. त्याला ऐटीत लाथेने ढोसत दिगूअण्णा पिशव्या सांभाळत घरात शिरले. बोका केकाटताच भिडेकाकूंनी अतिशय हिंस्र नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. पण त्याकडे साफ दुर्लक्ष करत दिगूअण्णा पंख्याखाली आरामखुर्चीत बसले.
"जरा पाणी आण गं", अशी ऑर्डर सोडायच्या बेतात असतानाच भिडेकाकूंचा अचानक गुरगुरल्यासारखा आवाज आला, "तुमचे कट्ट्यावरचे देशमुख भेटले होते बाजारात."
"हो का? काय म्हणत होता मुखडा?"
"पिंपाची चौकशी करत होते."
"कम्मालै, त्यांचंही हरवलंय वाटतं," वाढलेल्या गुरगुरीकडे दुर्लक्ष करत उगाचच खिदळत दिगूअण्णा उत्तरले.
"नाही, आपलं कुठंय ते विचारत होते."
"आहे की माळ्यावर. शोधणार आहे दुपारनंतर..." आता जरा सावधपणाचा पवित्रा दिगूअण्णांनी घेतला.
"मी तेच सांगितलं त्यांना," मांजर उंदराला खेळवत म्हणाली.
"त्याला हवंय का आपलं पिंप? देईन संध्याकाळी नेऊन."
"मला न विचारताच?"
"अगं तुला काय विचारायचं त्यात? कठीण प्रसंगात मित्राने मित्राला मदत केलीच पाहिजे. सामाजिक भान म्हणतात त्याला."
"मला न विचारताच तुम्ही पिंप विकलंत? काय केलंत त्या पैशाचं?" धुमसत असलेल्या ज्वालामुखीचा स्फोट व्हावा, तश्या भिडेकाकू उफाळल्या.
"अगं विकलं काय? काहीही...."
"तुम्ही पिंप विकलंत. देशमुखांना जुन्या बाजारात ते मिळालं. त्यावर माझं नाव लिहिलंय... माझं! कळलं? सौ. वत्सला दिगंबर भिडे..माझं नाव."
"अगं नावासारखी नावं नसतात का? काहीही तुझं आपलं..." कसेबसे स्वतःला सावरत दिगूअण्णा गुळमुळीतपणे म्हणाले.
"नावासारखी नावं असतात, पण पिंपासारखं पिंप नसतं. समजलं? चांगलं पंधरा लिटरचं पिंप, किती सुबक घाट त्याचा आणि ठोकेही अगदी सुरेख पाडलेले. माझं पिंप.... गेलं माझं कोल्हापूरचं पिंप..."
चार-पाच मिनिटं आक्रोश करत कपाळ बडवून झाल्यावर भिडेकाकू गर्रकन मागे वळल्या, "आता ऐका मी काय म्हणते ते. पुढचे चार दिवस..."
पण त्या काय म्हणताहेत, ते ऐकायला दिगूअण्णा होतेच कुठे जाग्यावर?
त्यांनी कध्धीच माळ्याची शिडी चढायला सुरुवात केली होती. पोटात जरा गडबड होतेय, असं वाटत होतं. पण त्याकडे साफ दुर्लक्ष करत काखोटीत चटईची गुंडाळी आणि हातात पलंगपोसाची घडी घेऊन दिगूअण्णा निघाले होते मुक्काम ठोकायला माळ्यावर...

0 comments:
टिप्पणी पोस्ट करा